माणुसकीचा ठेका काय फक्त भारताने घेतलाय का ? – राज ठाकरे

raj thakre

मुंबई, वृत्तसंस्था | “आमच्या पोलिसांना ४८ तास कारवाईचे स्वातंत्र्य द्या, मग ते काय करतात दिसेल. यापुढे नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल. पिढ्यान पिढ्या महाराष्ट्रात राहणारे मुसलमान प्रामाणिक आहेत. ते राहतात तिथे दंगली होत नाहीत. परदेशात घुसखोरांना थारा दिला जात नाही. मग माणुसकीचा ठेका काय फक्त भारतानं घेतलाय का ? ” असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि.९) येथे जाहीर सभेत केला.

 

महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्च्यानंतर आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. मनसेने राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ते पुढे म्हणाले की, “केंद्रावर टीका केली म्हणजे, भाजपच्या विरोधात आणि त्यांच्या एखाद्या निर्णयाला पाठिंबा दिला की, त्यांच्या बाजूने हा काय प्रकार आहे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलंच पाहिजे. १९५५ साली झालेल्या कायद्यात परिस्थितीनुसार बदल झालाच पाहिजे. सीएएमध्ये गैर काहीच नाही,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. राम मंदिर व कलम ३७० यांचेही मी आधी समर्थन केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मुस्लिमांनी सीएएविरोधात काढलेल्या मोर्चाचा मला अर्थच लागलेला नाही, मोर्चाला उत्तर मोर्चाने या आवाहनाला प्रतिसाद मिळालाय, असा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

मनसेने आज काढलेल्या महामोर्चाला प्रचंड गर्दी झाली असून घोषणांनी दक्षिण मुंबई दणाणली आहे. राज्यभरातून मनसे कार्यकर्ते मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब मोर्चात सहभागी झाले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जात आहे.

Protected Content