माजी सैनिकाला मारहाणीच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

खासदार उन्मेष पाटील गोत्यात येण्याची शक्यता

शेअर करा !

मुंबई वृत्तसंस्था । निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याने भाजपने शिवसेनेला घेरलेले असतानाच आता राज्यातील आघाडी सरकारने भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विट करत चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. २०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

भाजपने निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण झाल्याबद्दल आंदोलन सुरू केल्याने आता भाजपच्याच खासदाराने माजी सैनिकाला मारहाण केल्याचं उघड झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

एका माजी सैनिकाला न्यायाकरिता गेली चार वर्षे दारोदार भटकावे लागले. फडणवीस सरकारने दबाव आणून त्यांना छळ छळ छळले, जेलमध्ये टाकले, तडीपार केले. आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार सोनू महाजन यांना न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!