महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार येणार!: नाना पटोले

मुंबई-आगामी विधानभा निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही परिवर्तन घडवेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

 

बंगरुळूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर लाखो लोकांच्या साक्षीने सिद्दरमय्या यांनी मुख्यमंत्री तसेच डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची व काँग्रेसच्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

 

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारने कर्नाटकात डबल भ्रष्टाचार केला व जनतेचा पैसा लुटला. सामान्य जनतेच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करुन केवळ धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली परंतु कर्नाटकची सुज्ञ जनता भाजपाच्या भुलथापांना बळी पडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रातील डझनभर मंत्री यांनी प्रचारसभांचा धडाका लावला पण कर्नाटकच्या जनतेवर त्याचा काहीही फरक पडला नाही. महाराष्ट्रातही कटकारस्थान करून आलेले डबल इंजिनचे सरकार जनतेच्या मनातून उतरलेले आहे. भाजपाप्रणित शिंदे सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच पराभव करेल.

 

कर्नाटकातील काँग्रेस सरकार जनतेला दिलेली पाच महत्वाच्या आश्वासनांची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटपासूनच सुरु होईल. जनतेला दिलेली आश्वासने पाळणारे काँग्रेस सरकार असून महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार असताना दिलेल्या आश्वासनानुसार पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला होता. राज्यात सध्या असलेले शिंदे सरकार शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला, छोटे व्यापारी यांना उद्ध्वस्त करणारे आहे. या सरकारला आगामी निवडणुकांत कर्नाटकाप्रमाणेच त्यांची जागा दाखवून जनता काँग्रेसला विजयी करेल, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content