महाराष्ट्राच्या बदनामीचा मास्टर माइंड शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करा

महेश तपासे , सचिन सावंतांचा भाजपवर संताप

मुंबई: वृत्तसंस्था । महाराष्ट्राची बदनामी करणारा भाजप उघडा पडला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध लावण्यासाठी आता महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्समधील डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पथकाने दिलेला असून मुंबई पोलीसांचे चारित्र्य उजळून निघाले आहे. त्यांनी केलेली चौकशी प्रामाणिक व योग्य दिशेनेच चालली होती. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता, असे म्हटले होते.

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी व सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा बिहार निवडणुकीत वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मोठे षडयंत्र रचण्यात आले होते. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपाने रचले होते. नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही या बदनामीच्या कटात महत्त्वाची भूमिका वठवली होती. रातोरात शेकडो फेक सोशल मीडिया अकाऊंट उघडून महाराष्ट्राची, मुंबई पोलीसांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. या सर्वांचे पितळ आता उघडे पडले आहे, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्ला चढवला.

‘गोदी मीडियानेही महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अजेंडा चालवला. तपास यंत्राणांनीही खोटी माहिती लीक केली. कालपर्यंत सीबीआयचा हवाला देत ३०२ चा गुन्हा दाखल केला जाणार एवढ्या निखालस खोट्या, कपोलकल्पित बातम्या देण्यात आल्या. भाजपाचे नेते, त्यांचा आयटी सेल व गोदी मीडियाला हाताशी धरून पद्धतशीरपणे महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करण्याची भाजपाची ही कार्यपद्धती लोकशाहीसाठी घातक असून मुळाशी जावून मुख्य सुत्रधार कोण, याचा शोध घेणे आवश्यक आहे’, अशी मागणीच सचिन सावंत यांनी केली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. . बिहारची निवडणूक नजरेसमोर ठेवून हा मुद्दा रंगवण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार भाजपाच्या प्रवक्त्यांनी केला होता. बिहार पोलिसांनीही सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता, दावा करणारे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे आता राजकारणात उतरले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.