मलिक पुन्हा मोदी सरकारवर संतापले

 

मुंबई: वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कोरोना लसीकरणाच्या गोंधळावरून केंद्र सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

 

कोविड लसींच्या तुटवड्यामुळं देशात निर्माण झालेला गोंधळ अद्यापही संपलेला नाही. विविध राज्यांतील बिगर भाजप सरकारांनी या गोंधळासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. तर, केंद्र सरकारमुळंच दुसरी लाट आटोक्यात आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या प्रश्नावर बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असं सांगणं किती योग्य आहे. केंद्र सरकारनं निव्वळ हेडलाइन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा,’ अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

 

‘राज्यांना कशा पद्धतीनं लस पुरवठा केला जाणार याची माहिती दिली गेली पाहिजे. केंद्र सरकार लसींचे किती डोस खरेदी करणार? राज्यांना किती मिळणार आणि खासगी लोकांनी लस खरेदी करून त्याचा वापर किती, कसा करावा याबाबतची स्पष्ट माहिती केंद्र सरकारनं आजपर्यंत जाहीर केलेली नाही. प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा वेगळीच घोषणा करतात. फक्त हेडलाइन होण्यासाठी हे लोक बोलत असतात, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

 

१२ कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होत्या, मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला? कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जे वास्तव आहे, ते केंद्र सरकारनं स्वीकारावं आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा,’ अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!