भोंगे व लाऊडस्पीकर दिलेल्या वेळेतच वाजविता येणार – पोलीस अधिक्षक (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असून दिलेल्या वेळेतच भोंगे व लाऊडस्पीकर वाजविता येणार आहे, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुरूवारी ५ मे रोजी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

 

प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते.

 

धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत राज्य सरकारने पाऊले टाकली असून पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जळगाव जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. आजवर पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या ६०८ मस्जिद आणि ३७० मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

 

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले, पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात ६६३ मस्जिद असून त्यापैकी ६०८ मस्जिदींना परवानगी देण्यात आली आहे. ११ मस्जिदींवर भोंगे लावले नसल्याचे ट्रस्टने कळविले आहे. तसेच ४४ मस्जिदींना परवानगी देण्याचे काम अद्याप बाकी असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यात २८१९ मंदिरे असल्याची पोलिसांकडे माहिती असून त्यापैकी अर्ज केलेल्या ३७० मंदिरांना लाऊडस्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलीस प्रशासनाचे आहे. कुणी विना परवानगी असल्यास त्यांना मुभा दिली जाणार नाही. जर कुणी आढळून आले तर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!