भारती सिंगच्या घरातून गांजा जप्त

शेअर करा !

मुंबई : वृत्तसंस्था । बॉलिवूड ड्रग्ज साखळीत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात तिच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. यानंतर एनसीबीने भारती आणि तिचा नवरा हर्ष दोघांनाही कार्यालयात नेले.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने भारती आणि हर्ष यांच्या घरी छापा टाकला. आज सकाळी एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात अनेक ठिकाणी छापे टाकले.

पकडलेल्या एका ड्रग्ज पेडलरने भारती आणि हर्ष यांचं नाव सांगितलं. यानंतरच दोघांच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान एनसीबीला गांजा सापडला. भारती सिंग टीव्हीची पहिली लोकप्रिय अभिनेत्री आहे, यापूर्वी अभिनेता आणि मॉडेल अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता.

 

९ नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी दरम्यान एजन्सीने लॅपटॉप, मोबाइल फोन आणि टॅबलेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. यावेळी अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी करण्यात आली होती. रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची पत्नी यांनाही त्यांच्या जुहू येथील घरातून अटक केली होती.

यापूर्वी गॅब्रिएलाचा भाऊ अ‍ॅगिसिओसच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता. त्याच्याकडे अमली पदार्थ सापडल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात, एनसीबीने गॅब्रिएलाचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रिएडस लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून अटक केली होती.

 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर एनसीबीने मादक पदार्थांशी निगडीत व्हॉट्सअॅप चॅटच्या खुलाशानंतर यासंबंधीची चौकशी सुरू केली. यात एनसीबीने सर्वातआधी सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचे कर्मचारी यांना ताब्यात घेतलं. दीर्घकाळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून तुरुंगातही ठेवण्यात आलं. सध्या रियासह काही आरोपी जामिनावर सुटले आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!