भांडवली बाजाराचे बहरणे व अर्थव्यवस्था जेमतेम ; हे चित्र विसंवादी

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा इशारा

शेअर करा !

मुंबई : वृत्तसंस्था । विक्रमी बहरलेला भांडवली बाजार आणि जेमतेम सावरणारी अर्थव्यवस्था हे चित्र विसंवादी असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुनरुच्चार केला.

मालमत्तांचे हे अतिताणलेले मूल्यांकन आर्थिक स्थिरतेस धोका निर्माण करणारे आहे, असा इशाराही त्यांनी दिला. अर्थवास्तवाच्या विपरीत भांडवली बाजारातील उधाणाची बँका आणि अन्य वित्तीय मध्यस्थांनी सावधपणे दखल घ्यायला हवी, असे दास यांनी वित्तीय स्थिरता अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी वित्तीय स्थिरता अहवाल सादर केला. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाण्याआधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (एनएसओ) सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) संबंधाने अंदाज मांडला जातो.

कोरोना उद्रेकानंतर मार्चमध्ये ४० टक्क्यांनी गडगडलेले भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक नंतरच्या १० महिन्यांत ८० टक्क्यांनी उसळले; डीमॅट खातेदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे, याकडे लक्ष वेधतानाच दास यांनी, या गोष्टी सामान्य नसल्याचे स्पष्ट करीत त्याचा संबंध हा देशाच्या आर्थिक स्थैर्याशी असल्याचेही स्पष्ट केले.

कोरोना महामारीचा मुकाबला म्हणून सरकारची कर्ज उचल वाढली आहे, मात्र ती अशीच पुढे तीव्रपणे सुरू राहिल्यास त्यातून खासगी क्षेत्राला निधीचे स्रोत आटण्याची भीती असून, ही चिंतेची बाब असल्याचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.

टाळेबंदीच्या परिणामी आर्थिक क्रियाकलाप घटल्याने सरकारच्या महसुलातही घट झाली आहे, ती भरून काढण्यासाठी ही उसनवारी असली तरी त्यामुळे आधीच बुडीत कर्जात वाढीचा सामना करीत असलेल्या बँकांवर अतिरिक्त ताण पडत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!