जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांना त्रिची येथील केळी परिषदेत जीवन साधना गौरव-२०२० हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जैन समूहाच्या सहकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केळी पिकाच्या क्षेत्रात देशात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना जीवन साधना गौरव-२०२० हा मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिरुचिरापल्ली येथे शनिवारी आंतरराष्ट्रीय केळी परिषदेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे फलोद्यान विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए.के. सिंग, परिषदेचे कृषी अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक डॉ. के. अलगुसुंदरम, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. कुमार, बायोव्हर्सिटी इंटरनॅशनलचे आशियायी देशांचे संचालक डॉ. एन. के. कृष्णकुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जैन इरिगेशनच्या वतीने हा पुरस्कार जैन इरिगेशनचे टिश्युकल्चर मार्केटिंग प्रमुख के.बी. पाटील, टिश्युकल्चर प्रॉडक्शन प्रमुख डॉ. अनिल पाटील, डॉ. ए.के. सिंग, डॉ. एस. नारायण यांनी स्वीकारला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दिवंगत भवरलाल जैन यांनी केळी उत्पादन, प्रक्रिया व करार शेतीच्या क्षेत्रात ४० वर्षांत जे उल्लेखनीय काम केले त्यामुळेच भारत देश केळीच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे, असे गौरवोद्गार डॉ. ए.के. सिंग यांनी काढले.