भर दिवसा १५ लाखांची पिशवी घेऊन चोरटे पसार !

चोपडा प्रतिनिधी | बँकेतून काढलेल्या १५ लाखांची कापडी पिशवी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लुटून पलायन केल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील लक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंगचे मालक मनोज हरसाय अग्रवाल यांचे कर्मचारी संजय शिवदास पालिवाल (५२, रा महालक्ष्मी नगर चोपडा ) हे आज बस स्टँड जवळील आडगाव ,गोरगावले रिक्षा स्टाफ जवळ असलेल्या आय डी बी आय बँकेच्या शाखेत १५ लाख काढण्यासाठी चेक घेऊन एम एच सी इ १३९९ या क्रमांकाच्या ऍक्टीव्हावरून बँकेत गेले होते.

बँकेतून पैसे काढल्यानंतर कापडी पिशवीत सदर रकमेची पिशवी सोबत घेऊन खाली उतरले.यावेळी संजय पालिवाल हे ऍक्टिव्हा स्कुटीवर आले होते. या गाडीच्या पुढील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत पैश्यांची पिशवी ठेवण्यासाठी वाकले असता त्यांचा गाडीच्या हँडलवरील हात सटकला आणि ते काही सेकंदासाठी खाली वाकल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी १५ लाख असलेली कापडी पिशवी पळवून घटनास्थळावरून पलायन केले.

दरम्यान, परिसरातील काही सीसीटिव्हीच्या कॅमेर्‍यांमध्ये चोरटे कैद झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. तर या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!