भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक

एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकते कारचालक जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिवार ५ नोव्हेंबर रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ २६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता दिलीप लक्ष्मण चाळसे (वय-४७) रा. शिव कॉलनी, जळगाव हे कार क्रमांक (एमएच १९ बीई ५१००) या वाहनाने राष्ट्रीय महामार्गाकडून जळगावकडे निघाले होते. त्यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचालक दिलीप लक्ष्मण चाळसे हे जखमी झाले, तसेच कारचे मोठे नुकसान झाले. दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रकचालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमी झालेले कारचालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र तायडे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content