भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी येत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर पाळधी रोडवर गुरूवारी रात्री घडली असून याप्रकरणी पाळधी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेंद्र तुकाराम चौधरी (वय-५२) रा. माऊली नगर, आशाबाबा नगरजवळ हे पाळधी येथील गाडगे लॉजिस्टीक कंपनीत कामाला आहे. कंपनीतील काम आटोपून ते रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीबी ५२१६) ने घरी परतत असतांना राष्ट्रीय महामार्गावरील जैन पाईप कंपनीजवळ जळगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात योगेंद्र यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. दरम्यान, जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी सुमन, मुलगा रूपेश आणि मुलगी जयश्री असा परिवार आहे.

Protected Content