भरदुपारी चाकूने मारहाण करून २ लाख रूपये लुटणारे दोघे पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: दोन्ही संशयित यावल तालुक्यातील रहिवाशी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून अमळनेर येथे जाण्यासाठी निघालेल्या एकाला चाकूने मारहाण करून दुचाकीतील दोन लाख रूपयांची रोकड भर दिवसा लुटून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित दरोडेखोर यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय ३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण,जळगाव) हा सेंट्रिंग कामाची ठेकेदारी करतो. अमळनेर येथे त्याच्या घरी जाण्यासाठी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी बारानंतर निघाला होता. त्याच्यासोबत अमळनेर येथील प्लॉट व्यवहाराचे दोन लाख रुपये होते. परत येताना त्याच्या पत्नीलाही तो सोबत घेऊन येणार होता. जळगावहून धरणगावमार्गे दुचाकीने (एक्टिव्हा : एमएच १९, डीएच ६८४०) निघाल्यावर धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्याची एक्टिवा आणि त्याच्याजवळील दोन लाख रुपये घेऊन पसार झाले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर चौकशी केल्यानंतर दरोडेखोर हे जवळचेच व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी विशाल उर्फ मास चंद्रकांत भालेराव (वय-२०) रा. भालोद ता. यावल आणि अविनाश देवेंद्र तायडे (वय-२४) रा. अट्रावल ता.यावल या दोघांना अटक केली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोकॉ श्रीराम पाटील करीत आहे.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, विजय पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रितम पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडाळे, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content