ब्रेकींग : मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना अर्थात मसाकाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे हा कारखाना इतिहासजमा होऊन यावर लवकरच खासगी मालकी हक्क प्रस्थापित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन ते थकीत केले आहे. अशा संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांच्या लिलावातून कर्ज व व्याजाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय आधीच संचालक मंडळाने घेतला होता. या अनुषंगाने अलीकडेच फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना, यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणी यांना जिल्हा बँकेने ताब्यात घेतले होते. यानंतर आता मसाकासह दोन्ही सुतगिरण्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

आज या संदर्भात जिल्हा बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाची नोटीस आज काढली आहे. यात मशिनरीसह संपूर्ण कारखाना आणि कारखान्याच्या मालकीच्या २७.१९ हेक्टर जमीनीची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी ६२ कोटी ९५ लाख १५ हजार रूपयांची बेस प्राईस ठेवण्यात आलेली आहे. या कारखान्यावर जिल्हा बँकेचे ३० जून २०२२ अखेर ५५ कोटी ५४ लाख रूपयांचे येणे असून यासोबत ५ कोटी १३ लाख रूपयांचे व्याजही थकीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या कारखान्याचा लिलाव २४ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असल्याचे जिल्हा बँकेने जाहीर केले आहे.

 

आधीच यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि सूतगिरणीच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या सूतगिरणीसाठी ८ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून लिलाव होणार असल्याचे नोटिफिकेशन आधी काढण्यात आले होते. यात संपूर्ण मशिनरीसह सूतगिरणी व पडीत जागेचा लिलाव होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि, याला प्रतिसाद न लाभल्याने आता नव्याने ४ ऑगस्ट रोजी लिलाव होणार असल्याचे आजच्या जाहिरातीत नमूद केले आहे.

 

दरम्यान, खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या मालकीच्या ६.८६ हेक्टर जागेचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव ७ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून होणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र याला प्रतिसाद न लाभल्याने आता याचा ४ ऑगस्ट रोजी लिलाव होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.