ब्रिटनच्या पंतप्रधानांनी २३ वर्षे लहान प्रेयसीसोबत थाटला संसार

 

लंडन : वृत्तसंस्था । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लग्न गुपचूप उरकल्याची बातमी वेगाने पसरली आहे. प्रेयसी कॅरी सायमंडसोबत ते लग्नबंधनात अडकले आहेत.

 

हा विवाहसोहळा वेस्टमिन्स्टर कॅथड्रल चर्च येथे पार पडला.  मात्र जॉनसन यांच्या कार्यालयातून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कॅथलिक कॅथड्रल चर्च परिसरात दुपारी दीडच्या सुमारास  लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे नक्की काय झालं हे कुणाला कळलं नाही. त्यानंतर कॅरी सायमंड अर्धा तासांनी गाडीतून तिथे पोहोचली. तेव्हा तिने पांढरा शुभ्र लांब वधुचा ड्रेस परिधान केला होता.

 

पंतप्रधान बोरिस जॉनसन हे ५६ वर्षांचे तर कॅरी सायमंड या ३३ वर्षांच्या आहेत. जॉनसन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २०१९ पासून दोघेही डॉवनिंग स्ट्रीटमधील घरात एकत्र राहात आहेत. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं होतं. तर जुलै २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची निमंत्रणपत्रिका छापली होती. मात्र त्यापूर्वी या दोघांनी लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे.

 

या लग्नाची कुणकुण पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नव्हती. त्यामुळे त्यांनी लग्न केलं की, नाही याबाबत त्यांनाही माहिती नाही. इंग्लंडमध्ये लग्नात फक्त ३० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

बोरीस जॉनसन यांचं खासगी आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे. लग्नाबाबत खोटी माहिती दिल्याने त्यांची पक्षाच्या धोरण समितीतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांचा दोन वेळा घटस्फोटही झाला आहे.  त्यांना किती मुलं आहेत याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. जॉनसन यांचं यापूर्वी पेशाने वकील असलेल्या मरीना व्हीलर यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.