‘ब्रिटन’चे प्रतिष्ठीत वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ची टीका ; कोरोनाने भारताचा नरक केला !

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना संसर्गाने हिंदुस्थानातील यंत्रणा इतकी कोलमडली आहे की, कोरोनाने हिंदुस्थानचा पार नरक केला आहे अशी जहाल टीका ‘ब्रिटन’चे प्रतिष्ठीत वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ने केली आहे.

 

दुसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. बेडसाठी रुग्ण आणि नातेवाईकांचे अतोनात हाल होत असून, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही ऑक्सिजन व इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. ऑक्सिजनअभावी महाराष्ट्र आणि दिल्लीत झालेल्या घटनांनी आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडेच काढले असून, ब्रिटनमधील द गार्डियन वृत्तपत्राने कोरोनाने भारताचा नरक केल्याचं म्हटलं आहे. या वृत्तावरून शिवसेनेनं मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

 

द गार्डियननं भारतातील वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य सुविधांअभावी होत असलेल्या मृत्यूवरून भारतात कोरोनामुळे नरकासारखी परिस्थिती झाल्याचं म्हटलं आहे. या द गार्डियनच्या वृत्तावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “नाशिकपाठोपाठ मुंबई नजीकच्या विरार येथील एका कोविड इस्पितळास आग लागून १३ रुग्णांचा गुदमरून, जळून मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे दोन दिवसांपूर्वी २९ जण प्राणास मुकले. त्याआधी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयास आग लागली व १० बालकांचा मृत्यू झाला. भांडुपच्या ‘ड्रीम’ मॉलमधील कोविड सेंटरला लागलेल्या आगीतही ११ जणांना जीव गमवावे लागले. महाराष्ट्रात दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. या मालिकांचा शेवट काय ते कोणीच सांगू शकत नाही, पण कोरोनामुळे महाराष्ट्र व देश एका दुष्टचक्रात सापडला आहे हे नक्की,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

 

रुग्णांना बेड व प्राणवायू मिळत नाही, याची बोंब सुरू असताना जागोजागी कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागांना आगी लागून रुग्णांचे होरपळून मरण पावणे म्हणजे त्यांना जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलण्यासारखेच आहे. देशातील स्थिती हाताबाहेर गेल्याचे जगानेच मान्य केल्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय काय म्हणतेय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयांना अलीकडे उशिराने सोयीनुसार जाग येते. ही राष्ट्रीय आपत्ती आहे व या आपत्तीशी लढण्यासाठी केंद्र सरकारने काय योजना आखली आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने आता मागितली आहे. देशातील गंभीर स्थितीची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. आनंद आहे, पण प. बंगालातील राजकीय पुढाऱ्यांचे, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे लाखोंचे रोड शो आणि हरिद्वारमधील धार्मिक मेळे यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने योग्यवेळी घेतली असती तर लोकांना असे रस्त्यावर तडफडून मरण्याची वेळ आली नसती,” असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

 

 

 

“दिल्लीतील एका गंगाराम इस्पितळात प्राणवायूचा दाब कमी झाल्यामुळे चोवीस तासांत २५ कोरोना रुग्ण मरण पावले. ही देशाच्या राजधानीची स्थिती आहे. या स्थितीस देशाचे केंद्रीय सरकार जबाबदार नसेल तर कोण जबाबदार आहे? हिंदुस्थान  नरक बनला आहे असे आता परदेशी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची विदेशात काय प्रतिष्ठा राहिली?  रोज लाखांवर रुग्ण सापडत असताना पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्र सरकारने या संकटाकडे दुर्लक्ष केले. सत्ताधाऱ्यांचा हाच फाजील आत्मविश्वास कोरोना वाढीस कारणीभूत ठरला असे ‘फटकारे’ ‘गार्डियन’ने मारले आहेत. देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे,” अशा शब्दात शिवसेनेनं केंद्र सरकारला सुनावलं आहे.

 

“देशातील आरोग्य यंत्रणेने कोविड १९ च्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारने आरोग्य सुविधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी काय केले? हा प्रश्नच आहे. प. बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडूसारख्या राज्यांतील निवडणुकांकडे झोपून लक्ष देण्याऐवजी  दुसऱ्या लाटेकडे लक्ष दिले असते, तर हिंदुस्थानवर  नरकात पडण्याची वेळ आली नसती. गुजरात व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत रुग्णांच्या मृत्यूची संख्या लपवून ठेवण्यात आली. शवागारात मृतदेह लपवून ठेवले तरी नंतर स्मशानात सामुदायिक चिता पेटल्याच,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

“अच्छे दिन आणू असे वचन देणाऱयांच्या राज्यात रुग्णांना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, लस आणि औषधे नाहीत. फक्त तडफड आणि मनस्ताप आहे. नाशिक, वसई, विरार, भांडुप, भंडाऱयातील इस्पितळांत आगी लागून प्राणहानी झाली हे वास्तव आहे, पण अशी इस्पितळे घाईघाईत उभी करून त्यात रुग्णांना दाखल करावे लागले हाच खरा नरक आहे. देशाचा कारभार रामभरोसे चालला आहे, असे ताशेरे दिल्लीच्या उच्च न्यायालयाने मारले. सर्वोच्च न्यायालयानेही जाता जाता केंद्राला धारेवर धरले. केंद्राकडे राष्ट्रीय योजना काही असेल तर ती सादर करण्याचे फर्मान सर्वोच्च न्यायालयाने काढले. त्याने काय होणार? मोदी व त्यांच्या सहकाऱ्याना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो,” असे हताश उद्गार शिवसेनेनं काढले आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.