बासमती तांदळाच्या मुद्यावरून संघर्षाचा प्रयत्न

पाककडून भारताच्या दाव्याचा विरोध

इस्लामाबाद: वृत्तसंस्था । पाकिस्तानकडून आता बासमती तांदळाच्या मुद्यावरून भारताविरोधात संघर्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानकडून युरोपीयन युनियनमध्ये जिओग्राफीकल आयडेंडिफिकेशन टॅगसाठी भारताच्या दाव्याचा विरोध करण्यात येणार आहे.

काश्मीर आणि सीमा प्रश्नावरून भारतासोबत संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानने आता नवी खुसपट काढली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशनचे सचिव, तांदूळ निर्यातदार संघटनेचे प्रतिनिधी आणि कायदे तज्ञांनी सहभाग घेतला होता. पाकिस्तान हा बासमती तांदळाची सर्वात मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा दावा अयोग्य असल्याचा दावा तांदूळ निर्यातदारांनी केला. पाकिस्तान युरोपीयन युनियनमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध करणार असल्याचे दाऊद यांनी सांगितले.

इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी तांदूळ निर्यातदार आणि उपस्थित अन्य लोकांनी मांडलेल्या मुद्याचे समर्थन केले. भारताने युरोपीयन युनियनमध्ये बासमती तांदळावर पूर्ण स्वामित्वाचा दावा केला आहे. युरोपीयन रेग्युलेशन २००६नुसार, बासमती तांदळाचे उत्पादक म्हणून सध्या भारत आणि पाकिस्तानला मान्यता असल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे.

गंगा आणि हिमालयाच्या मैदानी भागात येणाऱ्या बासमती तांदळाची स्वाद आणि सुवास जगभरात प्रसिद्ध आहे. भारतात हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब आदी राज्यात बासमतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मध्य प्रदेशने जीआय टॅगची मागणी केली होती. त्याला पंजाबने विरोध केला. भारत दरवर्षी जवळपास ३३ हजार कोटी रुपयांचे बासमती तांदूळ निर्यात करतो.

कोणत्याही विशिष्ट उत्पादनांसाठी जिओग्राफीकल आयडेंडिफिकेशनमुळे खास ओळख मिळते. मध्य प्रदेशमधील झाबुआ येथील कडकनाथ कोंबडी आणि मलिहाबादी आंबा, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी, दार्जिलिंग येथील चहा, कांजीवरम साडी आदींसह जवळपास ५०० हून अधिक भारतीय उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.