जळगाव, प्रतिनिधी । बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बालसाहित्यिकांचे अजोड कार्य आहे. आबा महाजनांच्या जात्याच दर्जेदार साहित्याला अकादमीच्या पुरस्काराची मोहर लागली यामुळे खान्देशच्या मुला फुलांचाही सन्मान वाढलाय. आबा महाजन आज शिक्षकी पेशात नसले तरी ते बालकांवर सुसंस्कार करणारे कालातीत अक्षय समाजशिक्षक आहेत हे पुरस्काराने सिद्ध केले असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध बालसाहित्यिका माया धुप्पड यांनी केले.
एरंडोलकर बालसाहित्यिक आबा महाजन यांना नुकताच “आबाची गोष्ट ” या बालकथा संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आणि संलग्न शाखा तालुका पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन आबा महाजनांच्या कवितांचा अभिवाचनाचा कार्यक्रम दिनांक १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना माया धुप्पड बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षण उपसंचालक प्रख्यात कवी शशिकांत हिंगोणकर असून प्रमुख अतिथी रंगकर्मी “आयत पोयतं सख्यानं ” फेम प्रविण माळी,ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिंदे ( पाचोरा ) उपस्थित होते.
पुढील मार्गदर्शनात धुप्पड यांनी संस्कारक्षम कविता उद्धृत करून आबांची एक कवितेसह स्वलिखित ” चिमणी आणि फुले ” कविता सुरेल गाऊन मंत्रमुग्ध केले. प्रविण माळी (ठोंब्याच्या स्वप्नात व फोटोतले पणजोबा ) साभिनय आणि पत्रकार शिवाजी शिंदे (मी तर होणार शक्तिमान ), सुनिल दाभाडे ( चिऊताई अन् इंटरनेट ), आशा सोळुंके ( मारेल तुला छडी ), भिशी पाचोरा तालुका प्रमुख सारीका पाटील ( गणिताचे मास्तर ) भिशी तालुका प्रमुख अरुणा उदावंत ( माकडोबा आणि स्पायडर मॅन), सुष्मा पाटील ( दोस्त चार महिन्यांचा ), छाया पवार पाटील (आभासी रंग रंगला ),विजय लुल्हे ( छडी लागसं छम छम ” ही द्वैभाषिक अहिराणी ) यांनी आशय संपन्न कविता सादर केल्या.
ज्योती राणे यांनी ” कोकणात आपण जाऊ या ” कवितेचे सुमधुर गायन केले. अध्यक्षीय भाषणात कवी शशिकांत हिंगोणेकर म्हणाले की, ” आबा महाजनांचे साहित्य कालसुसंगत बालमानसशास्त्र, मूल्यसंस्कारक्षम व अत्याधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे अभिजात अक्षर वाड़मय आहे. परिणामी त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीच्या मागे पुरस्कार धावत येतात. प्रत्येक तालुक्यात पुस्तकांचे गाव आणि शिक्षकांची विभागीय साहित्य संमेलने झाली पाहीजे याबबतही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तावनेत भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी बालसाहित्यिक आबा महाजनांचा साहित्य प्रवास, लेखन वैशिष्ट्ये सांगत पुरस्कार व प्राप्त सन्मानांचा तपशिलवार सांगितले.
कार्यक्रमाची प्रेरणा डायट निवृत्त प्राचार्य नीळकंठ गायकवाड, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, निवृत्त केंद्रप्रमुख शिवाजी भैय्या पाटील, डायट जळगाव प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी दिली. तंत्रशुद्ध गुगल मीट व्यवस्थापन सुनिल दाभाडे यांनी केले. यशस्वितेसाठी अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी व कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी, ज्येष्ठ पत्रकार दिपक महाले, शरद महाजन, भाईदास सोमवंशी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन छाया पवार पाटील व आभार सुनिल दाभाडे यांनी मानले.