जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून तीन व्यापाऱ्यांच्या मालकीच्या ८७ हजार ४८० रूपये किंमतीच्या ज्वारीने भरलेल्या ३९ गोण्या दोन जणांनी वाहनातून चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रमेश किसनराव माळी (वय-५८), विनायक ज्ञानदेव राणे आणि सुनील भगीरथ जाखेटे यांचे धान्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर ३९ ज्वारीच्या गोण्या लावलेल्या होत्या. शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सय्यद कमर अली (वय-५५) आणि फारुख अब्दुल रज्जाक कच्ची (वय-५६) रा. वरणगाव ता.भुसावळ यांनी पिकअप व्हॅन (एमएच ०४ ईएल ८३०२) या वाहनाने वाहनातून ८७ हजार ४८० रूपये किंमतीच्या ३९ ज्वारीच्या गोण्या चोरून नेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानदार रमेश किसनराव माळी रा. योगेश्वर नगर,जळगाव यांनी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सय्यद अली करम अली आणि फारुख अब्दुल रज्जाक कच्ची दोन्ही रा. वरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.