बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची अवहेलना थांबवा – खा. उन्मेश पाटील

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाकडे होत असलेली उपेक्षा वेदना देणारी आहे.  ही  उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

 

साहित्य क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सामान्य जनतेला अपूर्व साहित्य निर्मितीतून जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक 2012 साली  तीन एकर जागेत आसोदा या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते.मात्र गेल्या नऊ वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो गती मिळालेली नाही. खान्देशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजी वाढली  आहे

 

खा उन्मेश पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी निरक्षर असूनदेखील अमोघ वाणीतून जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणार्‍या अमूल्य साहित्याची निर्मिती केली आहे. निसर्गकन्या कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक तात्काळ पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत अथवा ग्राम विकास निधी योजनेतून पूर्ण होणेबाबत कार्यवाही व्हावी.

 

 

झाडेझुडपे व  गवत वाढल्याने या स्मारकाबाबतच्या उदासिनतेमुळे पंचक्रोशीत  व्यवस्थेविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आहे. तीन एकर जागेत होणारे स्मारकासाठी पाच कोटी रुपये जिल्हा विकास नियोजन निधीतून खर्च करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती मात्र नंतर या कामाबाबत अक्षम्य दिरंगाई झाली

 

राज्यातील साहित्यिकांमध्ये देखील याबाबत वाढती नाराजी पाहता तातडीने बहिणाबाई चौधरी स्मारकाच्या उचित गौरव साठी कार्यवाही करावी.24 ऑगस्टरोजी बहिणाबाई चौधरी यांची जयंती असून यापूर्वी याबाबत कार्यवाही कराल. अशी अपेक्षा खा  उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी  यांनाही या आशयाचे पत्र खासदार उन्मेष पाटील यांनी दिले आहे .

 

Protected Content