‘बर्ड फ्लू’मुळे पहिला मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यातच आता बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. 

या ११ वर्षीय मुलावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

  दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असताना बर्ड फ्लूमुळे देशात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. हरयाणातील एका ११ वर्षीय मुलाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २ जुलै रोजी या मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मुलाला ताप आणि खोकला अशी लक्षणं होती. ही लक्षणं कोविडशी मिळती जुळती असल्यानं त्याला कोविडचा संसर्ग झाला असावा, असं डॉक्टरांना वाटलं. मात्र, मुलाच्या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर त्याला कोरोना झाला नसल्याचं समोर आलं.

त्यानंतर मुलाच्या चाचण्या करण्यात आल्या, ज्यात त्याला एविएन इन्फ्लुएन्जा (H5N1) म्हणजेच, बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचं निदान झालं.   उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी  मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि नर्सेना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.  त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.

 दुसरी लाट येण्यापूर्वी महाराष्ट्रासह अनेक राज्यात बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येनं कोबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. मात्र, बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याचं एकही प्रकरण समोर आलं नव्हतं. मात्र, एम्समध्ये झालेल्या मृत्यूमुळे बर्ड फ्लूनं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!