बनावट दस्तावेज बनवून महिलेची फसवणूक करणाऱ्यास न्यायालयीन कोठडी

जळगाव प्रतिनिधी । बनावट दस्तावेज तयार करुन तसेच खोटी महिला उभी करीत महिलेची शेतजमीन विक्री करणारा संशयित आरोपी प्रकाश रामचंद्र नेहकर (धोबी) रा. सम्राट कॉलनी याला शहर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याची १५ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, गुजरात येथील भावनगरातील आशा सुनिल ढोलकिया (४५) रा. बी अक्षर तेनामेंट शिवशक्ती पार्क शिहोर यांच्या मालकीचे कंडारी शिवारात शेत आहे. संशयित आरोपी प्रकाश रामचंद्र नेहकर याने आपल्या फायद्यासाठी या शेताचे बनावट कागदपत्र व उतारा तयार केला. तसेच त्या कागदपत्रांवर आशा ढोलकिया यांचे नाव लावून व बनावट महिला उभी करुन खरेदीखत तयार करीत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी केली होती. त्याचप्रमाणे या संशयित आरोपीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता कुणत्याही प्रकारचा नजराणा भरलेला नसून शासनाची फसवणूक केल्याची घटना ६ नोव्हेंबर २०११ रोजी घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ मार्च रोजी प्रकाश नेहकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रकाश नेहकर हे फरार होते. संशयित आरोपी शहरात आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी अटक केली. आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास पोहेकॉं रविंद्र सोनार हे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.