बनावट कंपनी सुरू करून ९७ लाख रुपयांचा गंडा

आयसीआयसीआय बँकेला चुना लावणाऱ्या ठगाला अटक

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावावर भारतात बनावट कंपनी सुरू करून बँकेला ९७ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. कर्जाच्या नावावर आयसीआयसीआय बँकेला लाखोंचा चुना लावणाऱ्या या ठगाला पोलिसांनी अटक केलीय.

आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही भामट्यांना मदत केल्याचं प्रथमदर्शनी लक्षात येतंय. राजेश शर्मा असं नाव सांगणाऱ्या या व्यक्तीचं नाव प्रदीप शर्मा असंही आहे. सिनेमात एकच व्यक्ती दोन वेगवेगळी रुपं धारण करून समोर येतो, तसाच शर्मानं दोन वेगवेगळ्या ओळख धारण करून आयसीआयसीआय बँकेला तब्बल ९७ लाखांना फसवल्याचं उघड झालंय.

हा सगळा प्रकार घडला २०१७ ते २०१८ दरम्यान. आरोपीनं परदेशी कंपनीच्या नावावर UAI SERVICES आणि MINDTREE नावाच्या दोन कंपन्या दिल्लीत सुरू केल्या केवळ पाच कर्मचाऱ्यांना कामालाही ठेवलं. दोन्ही कंपन्यांचे सॅलरी रजिस्टर वेगवेगळे परंतु, दोघांचे कर्मचारी हे पाचच लोक होते. एका कंपनीचा मालक राजेश शर्म असल्याचं दाखवण्यात आलं तर दुसऱ्या कंपनीचा मालक प्रदीप शर्मा असल्याचं दाखवण्यात आलं.

आरोपीनं कर्मचाऱ्यांच्या नावे वेगवेगळ्या कंपन्यांच्या सॅलरी स्लीपवर कार लोन आणि पर्सनल लोनही घेतलं होतं. कर्जाचा ८० टक्के भाग स्वत:कडे ठेवून २० टक्के ज्या कर्मचाऱ्याच्या नावावर कर्ज घेतलंय त्याला देत असे. याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या खोट्या सॅलरी स्लीपवर पाच लक्झरी गाड्या, ४ पर्सनल लोन आणि १० क्रेडीट कार्ड लोन घेतले होते.

कर्जाचे हफ्ते मिलाले नाहीत तेव्हा बँकेनं सेंट्रल दिल्ली पहाड गंज संगतराशन पोलीस स्टेशन गाठलं. २६ जून रोजी प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर २० सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आली.

चौकशी अंती राजेश शर्मा आणि प्रदीप शर्मा या दोन नसून एकच व्यक्ती असंल्याचं पोलिसांच्या ध्यानात आलं. या माणसानं दोन नावांची दोन वेगवेगळे पॅन कार्डही बनवले होते. अधिक चौकशी केली असता त्याचे सगळे पत्ते खोटे निघाले. पोलिसांनी कर्जातून घेतलेल्या गाडीवर लक्ष केंद्रीत केलं. चौकशीअंती राजेश शर्मा उर्फ प्रदीप शर्मा पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

एकाच मोबाईल क्रमांकावर दोन व्यक्तींचं आधारकार्ड बनवल्याचंही समोर आलंय. हे समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. आयकर विभागाकडूनही एकाच मोबाईल क्रमांकावर दोन पॅन कार्ड कसे दिले गेले? आयसीआयसीआयच्या ज्या कर्मचाऱ्यांनी खोट्या कागदपत्रं पडताळली त्यांचीही चौकशी सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.