बदनामी केल्याच्या संशयावरून प्राणघातक हल्ला

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पाचोरा वरसाडे ग्रामपंचायतीच्‍या निधी खर्चाबाबत गावातील एका तरुणाने मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या वेबसाईटवरून माहिती काढली.  ही माहिती सोशल मिडीयावर शेअर केली. यावरून तरुणाच्‍या कुटूंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

 

विजयसिंह धर्मा राठोड यांनी वरसाडे तांडा नंबर १ या गावासाठी विविध योजनेतून आलेल्या निधीची माहिती काढून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वरसाडे तांडाच्या ग्रुपवर टाकली होती. ही माहिती टाकण्यामागे आता तरी विकास कामे होऊन गाव प्रगतीपथावर येऊ द्या असा हेतू ठेवून त्याने कामांना सुरुवात करा व निधीचा योग्य वापर करा असे आवाहन केले होते. परंतु, या संदेशाचा गैरसमज करून सत्ताधारी सरपंच लिलाबाई शिवदास राठोड व त्यांचे पती शिवदास भुरा राठोड यांनी रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान त्यांच्या ४० ते ५० समर्थकांना सोबत घेत थेट विजयसिंह राठोड यांच्या घरावर हल्ला चढविला. रामकृष्ण राठोड यांच्या मालकीचे ॲक्वा फिल्टर प्लांटवर हल्ला चढवून प्लांटची तोडफोड केली. तसेच घरात घुसून रामकृष्ण विजयसिंग राठोड व यांची पत्नी आशाबाई राठोड व घरातील इतर सदस्यांना बेदम मारहाण केली. यात रामकृष्ण विजयसिंग राठोड व आशाबाई राठोड जखमी झाले असून आशाबाई हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व मणी तसेच इतर किंमती वस्तू गहाळ झाल्या आहेत. त्यांनी कसातरी पळ काढून जीव वाचवत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!