बंधुभाव सोडू नका ; उदयनराजेंचे तमाम जनतेला आवाहन

 

 

सातारा : वृत्तसंस्था ।  लोकांना हात जोडून विनंती करीन, मेहेरबानी करा. कोणत्याही विचाराला बळी न पडता बंधुभावाने आपले पूर्वज राहात होते, तसंच आत्ताही आणि भविष्यातही प्रत्येकानं राहायला हवं. हीच शिवाजी महाराजांची लोकशाहीची कल्पना होती”, असं आवाहन आज खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांनी केलं

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते साताऱ्यामध्ये छत्रपतींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांनाच जाहीर आवाहन केलं आहे. सध्या विविध समाजांत निर्माण झालेली तेढ घातक असून शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हे स्वराज्य नाही, असं देखील त्यांनी नमूद केलं. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, पण त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केली जात नाही, असं देखील उदयनराजे भोसले यांनी नमूद केलं आहे.

 

सध्याची परिस्थिती पाहून आपल्याला खंत वाटत असल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले. “खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या स्थापनेचा हा पहिला दिवस. वेगवेगळ्या जातीधर्मातल्या लोकांना एकत्र करून कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला आपलंसं समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटचाल केली. रयतेचा राजा म्हणून छत्रपतींची ओळख आहे. स्वराज्याचा विचार त्यांनी मार्गी लावला. पण खंत ही आहे की जी स्वराज्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती, जी त्यांनी अंमलातही आणली, ती आता गेली कुठे? त्या काळातलं रयतेचं राज्य गेलं कुठे? तेव्हा लोकं बंधुभावाने राहात होते. त्यांच्यात तेढ कुणी निर्माण केली?”, असा सवाल त्यांनी केला.

 

“मन अत्यंत दु:खी झालंय. प्रत्येक जण आज शिवाजी महाराजांचं नाव घेतो. मग तो कोणताही पक्ष असो. पण जेव्हा त्यांचे विचार आचरणात आणण्याची वेळ येते, तेव्हा तसं काही पाहायला मिळत नाही. व्यक्तीकेंद्री विचार आचरणात आणले जातात. समाजांमध्ये तेढ का निर्माण झाली?”, असं देखील साताऱ्यात उदयनराजे भोसले म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणायचे नसतील, तर नुसती पुस्तकं वाचून उपयोग नाही, असा मुद्दा  उदयनराजे भोसले यांनी मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली ही लोकशाही नाही. महाराजांबद्दल अनेक इतिहासतज्ज्ञांनी पुस्तकं, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनेकांनी त्या वाचल्या आहेत. पण वाचून करता काय? त्यांचे विचार जर अंमलात आणले जाणार नसतील, तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आधीच वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण झाली आहे. सर्व जातीधर्मात आपले सगळ्यांचे मित्र आहेत. पण त्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झालेला जाणवतो.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.