बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । फक्त 2 मे पर्यंत थांबा पश्चिम बंगालचे निकाल लागताच  महाराष्ट्रात सत्तांतर होणार असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीच सत्ता आल्याने भाजपचा अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’  बारगळण्याची चिन्हे  आहे.

 

फेब्रुवारी 2021मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असं फडणवीस म्हणाले होते.

 

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तर 2 मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील सत्तांतर अवलंबून असल्याचं बोललं जात होतं.

 

मार्च महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त बैठक होती. मात्र, एका वृत्तपत्राने या भेटीचं वृत्त देऊन खळबळ उडवून दिली होती. या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असंही म्हटलं जात होतं. त्याचवेळी भाजप नेते राम शिंदे यांना अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राम शिंदे यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया देऊन संभ्रमात भर टाकली होती.

 

भाजपचे नेते बंगालमध्ये चमत्कार होण्याची अपेक्षा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या रणनीतीद्वारे बंगालमध्ये सत्ता स्थापन करता येईल, अशी आशा भाजपला होती. त्यामुळेच बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. तसं भाजपचे नेतेही बोलून दाखवत होते. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असल्याने भाजप राज्यात सत्तांतर घडवण्याचा प्रयत्न करेल याची शक्यता नाही. तसं झाल्यास भाजपच्या विरोधात जनमाणस जाऊ शकतं. त्यामुळे भाजप चुकूनही महाराष्ट्रात सत्तांतर करण्याचा प्रयत्न करणार नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.