जळगाव प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरात चप्पल विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या १५ हजार रूपये किंमतीच्या गोणीभर चप्पल, सॅंडल लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आला होता. शहर पोलीसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना बुधवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी जुबेर युसूफ शेख (वय-२७) हा फुले मार्केट परिसरात हातगाडीवर चप्पल, सॅंडल विक्रीचा व्यवसाय करतो. मंगळवार २८ रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, फुले मार्केट गेट जवळ दुकान लावले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने सर्व माल ६ गोणीत भरून त्याने समोर असलेल्या दु.क्र.१२८ च्या बाहेर ठेवून घरी निघून गेलो. दुकान मालक अजय चौधरी यांना सांगून जुबेर घरी गेला आणि सायंकाळी ५ वाजता परत आला. दुकानाबाहेर ठेवलेल्या गोण्या पहिल्या असता ६ पैकी एक गोणी दिसून आली नाही. गोणी चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी १५ हजार २१२ रुपयांच्या चप्पल चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तपास करीत होते. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ यांनी तपास केला असता घटनेच्या दिवशी किशोर बाविस्कर हा एक गोणी घेऊन जात असताना त्याला काही नागरिकांनी हटकले असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांच्या वर्णनावरून शोध घेतला असता महेश राजेंद्र तायडे (रा.२१ वाल्मिक नगर), शोएब शेख अख्तर (वय-३३) रा.रथ चौक, किशोर जानकीराम बाविस्कर (वय-३१) रा.वाल्मिक नगर यांची नावे निष्पन्न झाली. पोलीस कर्मचारी किशोर निकुंभ, संतोष खवले, योगेश इंधाटे, उमेश भांडारकर यांच्या पथकाने महेश तायडे याच्या घरी चौकशी केली असता त्याने घराच्या माळोच्यावर काहीतरी गोणी फेकल्याचे समजले. पोलिसांनी तपासणी केली असता चोरलेला मुद्देमाल मिळून आला. परिसरात तिघे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास किशोर निकुंभ करीत आहे.