फडणवीस विधानसभेत खोटे बोलले , चौकशी करा — नाना पटोले

 

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  देवेंद्र  फडणवीस यांनी  विधानसभेत सीडीआरबाबत खोटी माहिती दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. त्यामुळे वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

 

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  बालीश आरोप करत आहेत, अशी टीका करतानाच रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत, असं पटोले म्हणाले.

 

सरकारे येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

परमबीर सिंग, रश्मी शुक्ला प्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही, असं सांगतानाच काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Protected Content