नवी दिल्ली । फक्त मोदी आणि शहांवर अवलंबून राहू नका असा इशारा देत संघाने भाजपला संघटनेची पुनर्रचना करावी लागणार असल्याचे सूचित केले आहे. संघाचे मुखपत्र असणार्या ऑर्गनायझर या नियतकालीकातून हे धडे देण्यात आले आहेत.
संघाचे मुखपत्र असणार्या ऑर्गनायझर या नियतकालीकाच्या ताज्या अंकात भाजप नेत्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. यात डेल्ही डायव्हर्जेंट मँडेट या शीर्षकाखालील लेखातून दिल्ली विधानसभेच्या निकालावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, भाजपासाठी शाहीन बागेचा मुद्दा अयशस्वी ठरला कारण अरविंद केजरीवाल यांनी याला समाप्त करून टाकले. अर्थात, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बहाण्याने वापरल्या जाणार्या मुस्लिम मूलतत्त्ववादाचे मोठे आव्हान केजरीवाल यांच्यासमोर असणार आहे. ते हनुमान चालीसापासून अंतर कसे ठेवतील? केजरीवाल भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढच्या टप्प्यावर कसा घेतील? असे अनेक प्रश्न दिल्लीकर विचारतील.
दरम्यान, भाजपची रणनिती आणि स्थानिक यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे यात म्हटले आहे. आपने दणदणीत विजय विरोधी पक्षाला ज्या पद्धतीने पराजीत केले ते पाहता भाजपाला अगदी तळागाळापर्यंत बदल करावे लागतील. दिल्लीच्या जोरदार पराभवानंतर भाजपाला आपल्या सरचिटणीसांविषयीही विचार करावा लागणार असल्याचे यात सूचित करण्यात आले आहे. तसेच मोदी व शहांवर अवलंबून न राहता पक्षाची पुर्नरचना करण्याचे यात सुचविले आहे.