फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धर्म बोलून उपयोग नाही तर तो प्रत्येकाला जगता आला पाहिजे. धर्म, अध्यात्म, परमार्थ तरुण वयात करावयाच्या गोष्टी असून व्यसन मुक्त तरुण ही सतपंथाची विश्व ओळख निर्माण व्हावी असे सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी टॉक शो मध्ये सांगितले.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी १८ ते ४५ या वयोगटातील तरुणांनी एकत्र येण्यासाठी ‘जीवनाचे निर्माण सतपंथा सोबत’ आयोजित टॉक शोमध्ये मार्गदर्शन केले. यात त्यांनी सतपंथ म्हणजे काय ? नियम, आचार, विचार, याबद्दल विचारलेल्या शंकांचे निरसन केले. आपण जीवनात सर्व शिकलो पण जगतो कशासाठी हेच माहिती नसल्यास त्या जगण्याचा उपयोग काय ? आपण आधी माणूस बनले पाहिजे नुसते शिक्षण पैसा संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे तर देवाबद्दल आपल्या मनात जोपर्यंत स्थान निर्माण होत नाही तोपर्यंत आपण सुखी समाधानी राहू शकत नाही. तरुणांनी इतर सर्व जबाबदारी सोबत आपल्या जीवनाचे निर्माण करावे. याबद्दल त्यांनी सोदाहरण देऊन विचार स्पष्ट केले. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता विज्ञानावर विश्वास ठेवा. जीवनात आत्मबल मनोबलाचे खच्चीकरण कधीही होऊ देऊ नका असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. व्यसनमुक्त तरुण ही सतपंथाची विश्व ओळख निर्माण व्हावी असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून असंख्य युवा युवती उपस्थित होत्या. फेसबूक तथा यु ट्युब लाईव्ह कार्यक्रम असल्याने जगभरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.