जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेचा ३५ लाखांचा बोजा न दाखवता नाशिक येथील प्लॉट विक्री करायचा असल्याचे सांगून त्यापोटी १० लाख ७५ हजार रुपये घेवून प्लॉट खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करत मानराज पार्कजवळील विद्या नगरात राहणाऱ्या तरूणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ मे रोजी सकाळी १० वाजता शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मानराज पार्कजवळील विद्या नगरातील निशिगंधा अपार्टमेंटमध्ये सचिन चंद्रकांत शिरुडे हे वास्तव्यास असून ते औषधींचे डीस्ट्रीब्युटर्स आहे. त्यांचे मामा राजेंद्र येवले यांचे साडू अविनाश तुकाराम येवले रा. राजश्री एम्पायर, अभियंता नगर कामटवाडा नाशिक यांच्याशीपुर्वी जवळचे संबंध होते. मे २०१७ मध्ये अविनाश येवले यांनी नाशिक येथील त्यांच्या मालकीचा प्लॉट भविष्यातील गुंतवणुकींच्या दृष्टीने खरेदी करण्यासाठी गळ घातली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून ३० मे २०१७ मध्ये सचिन शिरुडे हे त्यांच्या वडीलांसोबत नाशिक येथे गेले होते. प्लॉट बघितल्यानंतर सचिन शिरुडे यांनी जळगाव तहसील कार्यालयाजवळ आले होते. यावेळी अविनाश येवले यांनी सांगितले की, हा प्लॉट बोजाविरहीत व बिनाजोखमीचा असून ११ लाख ११ हजारात या प्लॉटचा सौदा झाला होता. त्यानुसार ११ हजार बयाना रक्कम दिली. प्लॉटच्या खरेदीसाठी उर्वरीत पैसे वेळोवेळी सचिन शिरुडे यांनी आपल्या बँक खात्यातून अविनाश येवले यांच्या खात्यावर सुमारे ९ लाख ४८ हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या खात्यावरुन १ लाख २७ हजार असे एकूण १० लाख ७५ हजार रुपये पाठविले आहे. पैसे पाठविल्यानंतर शिरुडे यांनी प्लॉट खरेदी करुन देण्यासाठी तगादा लावून देखील अविनाश येवले यांनी प्लॉट खरेदी करुन दिला नाही. अविनाश येवले हे प्लॉट खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करीत होते. यावेळी सचिन शिरुडे यांना समजले की, त्यांनी केलेल्या व्यवहारातील प्लॉटवर येवले यांनी ९ नोव्हेंबर २०१७ रोजी बँकेचा ३५ लाखांचा बोजा असल्याचे दिसून आले. त्यानुसार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन शिरुडे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी १९ मे रोजी सकाळी १० वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.