फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामंडलेश्वर जनार्दन आधीचे महाराज यांच्या प्रेरणेने व संकल्पनेतून समरसता महाकुंभात लाखो भाविकांची उपस्थिती लाभल्यानंतर परिसरात उभारण्यात आलेला सभामंडप, ब्रह्मभोजन मंडप व पार्किंगची सुविधा आदी ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात आलेले मंडप काढून तेथील परिसराची स्वच्छता करण्यात आली.
महाकुंभात महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील भाविकांची देखील संख्या जास्त होती. गुजरात राज्यातून तर सुमारे 30 लक्झरी, चार चाकी वाहने आणि आगगाडीने भाविक समारंभात सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. रस्ते नादुरूस्त व अनेक अडचणी असूनही कोणीही कोणतीच तक्रार केली नाही. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, समरसता महाकुंभ हा इतिहासाचा साक्षीदार राहणार असून मला आयुष्यभराचे समाधान मिळाले आहे. महाकुंभ यशस्वी केल्याबद्दल आपण भाग्यवान आहोत. निसर्ग, नियती व प्रकृती आपल्यासोबत होती. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. साधूमहात्म्यांनी आपली प्रशंसा केली. व्यवस्थापन व समितीचे कौतुक केले. तरूणांचे मोठ्या प्रमाणात संघटन होऊन त्यांच्या हातून देश, धर्माचे कार्य झाले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राज्या- राज्यात याच महाकुंभाची चर्चा आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी महाकुंभासाठी स्वयंप्रेरणेने शेती उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांच्या शेतीत जमा झालेला कचरा तसेच प्लास्टिक व इतर वस्तू जमा करून स्वच्छता मोहीम दि. ५ जानेवारी २३ रोजी दुपारी दोन वाजता राबविण्यात आली.
जमा झालेला कचरा खड्ड्यात पुरणार असून कुठेही नदी, नाले या ठिकाणी फेकून वातावरण दूषित करणार नाही असे पूर्वनियोजित संकल्प करून त्याची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात आली. सुमारे दीडशे स्त्री-पुरुष स्वयंसेवकांनी परिसरातील कचरा, फुलमाळा, प्लास्टिक, कागद, कॅरीबॅग व अन्य निरूपयोगी वस्तू एकत्र करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. भुसावळ येथील नगरसेवक पिंटूभाऊ कोठारी यांनी वढोदे येथे सुरूवातीपासून स्वेच्छेने काम करत असलेल्या २० महिलांना साडीचोळी भेट दिली. महाकुंभातील प्रत्येक गोष्ट नोंद घेण्यासारखी होती. साधू संतांची शंभर टक्के उपस्थिती, शिस्त, शांतता, नियोजन, भक्ती, श्रध्दा यांचा समरस होऊन हा महाकुंभ यशस्वी झाला. परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराजांनी सर्वांचे आभार मानून धन्यवाद दिले. भविष्यात पुन्हा असे कार्यक्रम आयोजित करून समाज, देशाचे नाव उज्वल करण्यास खारीचा वाटा उचलू असे सांगितले.