मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – पोलखोल यात्रेवरून मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी राडा होत आहे, कांदिवली, चेंबूर, गोरेगाव पाठोपाठ आता दहिसर मध्ये देखील भाजपा शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवसेनेची अबाधित सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपकडून पोलखोल सभेच्या माध्यमातून पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला जात आहे. राज्यात तसेच मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना विरुध्द भाजपात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाजपा शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले असून वादविवाद होत आहेत.
कांदिवली, गोरेगाव पत्राचाळ चेंबूर येथे भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड झाली होती. त्यात आता दहिसरमध्ये पोलखोल अभियानासाठी बांधलेल्या स्टेजवर शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांनी आक्षेप घेतला असून स्टेज अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप केला आहे. त्यावरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या सभेवरून वादाची ठिगणी पडली.
दहिसर परिसरात सुरु असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल या कार्यक्रमाच्या सभेची परवानगी पाहण्यासाठी मागितली परंतु त्याला न जुमानता भाजपा कडून तयारी करणाऱ्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पोलीस आणि महापालिकेच्या सहाय्याने सभामंच आणि इतर तयारीवर कारवाई करण्यात आली असल्याचे सेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.