चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बुद्रुक येथील माहेर असलेल्या विवाहितेला मोबाईल दुकानातील सामान घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पतीसह सासरच्या मंडळींविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी येथील माहेर असलेल्या साजेदा हुसेन सैय्यद यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे राहणारे हुसेन शहानुर सय्यद यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती हुसेन सैय्यद याने विवाहितेला मोबाईल दुकानातील सामान घेण्यासाठी माहेरुन ५० रुपये आणण्याची मागणी केली. दरम्यान पैसे आले नाही म्हणून तिला मानसिक त्रास दिला. जर पैसे आले नाहीत तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याच्यासोबत ननंदची मुलगी यांनीदेखील मारहाण केली. तसेच सासू व जेठ यांनी शिवीगाळ करून पेट्रोल टाकून तुला जाळून टाकू अशी धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत गुरुवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती हुसेन शहानुर सैय्यद, सासू नइम शहानुर सय्यद, नणंद नजमा जमीर शेख, जेठ कालू शहानुर सय्यद, अय्युब शहानुर सय्यद, ननंदची मुलगी मोजमीन सलीम शेख सर्व रा. गंगापूर जि. औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक शंकर जंजाळे करीत आहे.