पिक नुकसानाची भरपाई तातडीने देण्यात यावी; संभाजी ब्रिगेडचे निवेदन

नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील ४-५ दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी बांधवांचे खूप नुकसान झालेले आहे. गहू, कांदा, हरभरा यांसह द्राक्षांच्या बागांचीही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अस्मानी संकटाबरोबरच सरकारही शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय निर्दयी भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला भाव नसून मातीमोल भावात माल विकावा लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहे.सरकारने या सर्व भीषण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करुन त्यांच्या खात्यात लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी.कोरडवाहू साठी एकरी २५ हजार रुपये आणि बागायतदारांसाठी एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई सरकारने शेतकऱ्यांना देवून शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाचा भार थोडाफार तरी कमी करावा.

सरकारने नियमांची बतावणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हासंपर्कप्रमुख भागवत मुंढे, नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील, तालुका उपाध्यक्ष दिलीप कोल्हे, शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर, पद्माकर ढोले, अक्षय बोचरे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content