पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी विद्यापीठात सौर उर्जा प्रकल्प उभारणीस प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह नियोजन विकास निधीतून सार्वजनिक ठिकाणी उभे राहणारे प्रकल्प समाजासाठी फायदेशीर ठरणारे असून विद्यापीठासारख्या शिक्षणाच्या मंदिरात सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी हातभार लागत असल्याचा खूप मोठा आनंद आहे. भविष्यातही विद्यापीठाच्या विविध विकास प्रश्नांवर कायम सहकार्य राहील अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डीपीडीसीच्या निधीतून पारेषण संलग्न सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून शनिवार दि.४ जून रोजी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकल्प उभारणीस प्रारंभ झाला. यावेळी अधिसभा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार उपस्थित होते.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, डीपीडीसीचा निधी सत्कारणी लागावा अशी माझी आणि जिल्हाधिकारी यांची कायम इच्छा राहिली आहे. सिव्हील हॉस्पीटल आणि विद्यापीठ या दोन संस्था मध्ये सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. विद्यापीठाविषयी आस्था असून गुरूजनांचा सहवास लाभलेल्या या शिक्षणाच्या मंदिरात हा प्रकल्प उभा राहत आहे याचा मोठा आनंद आहे. जिल्ह्यात राजकारणाच्या पलिकडे जावून समाजाभिमुख काम करण्याचे आपले प्रयत्न असतात. विद्यापीठाच्या सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाल्यानंतर याच क्षमतेचा आणखी एक सौर उर्जा प्रकल्प डीपीडीसीमधून मंजूर केला जाईल असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. विद्यापीठाचे दोन वसतिगृहांचे शासन दरबारी असलेले प्रस्ताव लवकरच मार्गी लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतांना याप्रकल्पामुळे एक तृतीयांश विजेची बचत होणार असल्याचे सांगितले. डीपीडीसीमधून विद्यापीठाला दहा हायमास्क लँप द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. राज्यशासन, विद्यापीठाची सर्व प्राधिकरणे एकत्र येवून विद्यापीठाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही कुलगुरुंनी दिली.

प्रा. किशोर पवार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाचे व्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांचेही स्वागत करण्यात आले. जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, प्रा. जे.बी. नाईक तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर. गोहिल उपस्थित होते. जळगाव जिल्हा नियोजन व विकास समितीने या ६५० किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पासाठी ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ९६० रुपयांचा निधी दिला आहे. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (मेडा) ही या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!