पत्नी नांदायला येत नाही म्हणुन पतीने केले शालकाचे अपहरण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने चक्क शालकाचे अपहरण केल्याची घटना दि. २९ मे रोजी घडली. दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी अथक परिश्रम घेत अपहरणकर्त्यास पकडुन त्याच्या ताब्यातील बालकास सुखरुप बहिणीकडे सुपुर्द केले आहे.

 

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील नगरदेवळा सिम येथील सासर असलेला धनराज जगन्नाथ पाटील रा. साकोरा ता. नांदगाव जि. नाशिक यांची पत्नी गेल्या एक महिन्यापासून नांदायला येत नसल्याने धनराज पाटील याने दि. २९ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रामानंद नगर, पाचोरा येथील लग्नसमारंभातुन सुरेखा दिपक रणदिवे हिचा भाऊ गौतम दिपक रणदिवे (वय – ७ वर्ष) यास अपहरण करून घेवुन गेला होता. दरम्यान सुरेखा रणदिवे यांच्या फिर्यादीवरून धनराज पाटील यांचे विरुध्द पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी गौतम याचा साकोरा ता. नांदगाव येथे शोध घेतला असता त्याठिकाणी धनराज व गौतम हे आढळून आले नाही. दरम्यान पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी धनराज पाटील यांचे मोबाईल लोकेशन घेतले असता लोकेशन हे मनमाड येथील दाखवत असल्याने विश्वास देशमुख यांनी मनमाड गाठले. मनमाड शहरात मोबाईल लोकेशन द्वारे तपास अवघड होत असतांना विश्वास देशमुख यांनी मनमाड येथील मा. नगरसेवक अमिन पटेल, सिव्हील काॅन्ट्रक्टर निलेश कमोदकर, रा. काॅं. शहर उपाध्यक्ष जाविद शेख, समाज सेवक बबलु काजी, तांबोली समाज शहर उपाध्यक्ष मुश्ताक तांबोली, नाशिक पोलिस सदाशिव देशमुख यांना गौतम व धनराज यांचे फोटो दाखवुन शोध कार्य सुरू केले असता धनराज व गौतम हे मनमाड शहराच्या एका गल्लीत सापडले.

 

पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख यांनी दोघांना ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले. व गौतम रणदिवे यास बहिण सुरेखा रणदिवे यांच्याकडे सुखरुप सुपुर्द केले. अखेर एका बहिणीस आपला ७ वर्षाचा भाऊ सुखरूप परत मिळाल्याने सुरेखा रणदिवे यांना आनंद अश्रु अनावर झाले होते. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख व पोलिस काॅन्स्टेबल अमोल पाटील यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content