नागपूर प्रतिनिधी | आरोग्य सेवा भरती प्रक्रियेतील गोंधळ मिटला नाही तोच आता नागपुरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा दावा करत अभाविपने आंदोलन सुरू केले आहे.
आज एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ परीक्षा आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यानंतर संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन करत बसले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांचा दावा केला आहे की, सकाळी त्यांना परीक्षा केंद्र मधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले परीक्षा केंद्रावरील कर्मचार्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अभाविपने संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून देत परीक्षा केंद्र समोर ठिय्या आंदोलनाला बसले आहे.
दरम्यान, आजच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा २०२१ चा पेपर फटल्याबाबत अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मात्र, याबाबत आता आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे.