जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ रोडवरुन एका कारमधून विक्रीसाठी जात असलेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध गुटख्यावर बुधवार, ४ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ७५ हजारांचा गुटखा व कार असा एकूण ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुरुवार, ५ जानेवारी रोजी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा येथील शेख इम्रान शेख जहुरोद्दीन हा एम.एच. १९ ए.एक्स ३५१० या क्रमाकांच्या कारमधून जळगाव ते भुसावळ महामार्गाने मोठ्याप्रमाणावर गुटख्याची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक गणेश चौभे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर, यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावर टोलनाक्याजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित क्रमाकांची कार आल्यावर तिची तपासणी केली असता, कारमधून २ लाख ७५ हजार २६४ रुपयांचा विमल पान मसाला व तंबाखू मिळून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अन्न औषधी विभागाच्या माध्यमातून कारवाई करत याप्रकरणी शेख इम्रान शेख जहुरोद्दीन यांच्याविरोधात आज गुरुवारी नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.