धावत्या रेल्वेतून पडल्याने वृध्द प्रवासीची मृत्यू

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसोदा शिवारातील डाऊन रेल्वेलाईनवर धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाबुभाई माणखाँ पठाण (६९, रा.नगरसूल, ता.येवला, जि.नाशिक) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बाबूभाई पठाण हे शुक्रवारी ५ मे रोजी रेल्वेतून प्रवास करीत होते. आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाईनवरील खांबा क्रमांक ४२६/ १ ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधारकार्ड, मतदानकार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांनी लागलीच येवला पोलिसांना संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर येवला पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्यानंतर नातूशी संपर्क झाला. शिंदे यांनी लागलीच पठाण यांचा नातू इरफान याच्या मोबाईलवर मृतदेहाची फोटो पाठविल्यानंतर त्याने त्याच्या आजोबांना ओळखले. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान, मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला असून याप्रकरणी तालुका पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content