धावत्या रेल्वेखाली आल्याने सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईन दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने हरीविठ्ठल नगरातील १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहित लक्ष्मण मोरे (वय-१६) रा. तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मृत मुलाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित मोरे हा आपल्या परिवारासह हरीविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत आई किरणबाई व वडील लक्ष्मण मोरे यांच्यासोबत वास्तव्याला होता. रामानंद नगरातील बहिणाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रोहित हा घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वेलाईन दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४१५/१६ ए जवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. एकुलता एक मुलगा गेल्याने आई व वडीलांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास महाजन करीत आहे.

Protected Content