दोन चंदन तस्कर जेरबंद; दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातून चंदनाचे झाडे तोडून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय बळीराम बंगाळे वय 48 रा. वाकडी ता.चाळीसगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या नाल्याजवळ चंदनाची झाडे लावलेली होती. २३ मार्च दरम्यान संशयित आरोपी वजीर खान मेहमूद खान (वय 32) आणि असलम चांद खान दुलोद (वय 23) दोन्ही रा.कुंजखेडा ता.कन्नड जि.औरंगाबाद यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंत चाळीसगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन संशयित आरोपी वजीर खान मेहमूद खान (वय 32) आणि असलम चांद खान दुलोद (वय 23) दोन्ही रा.कुंजखेडा ता.कन्नड जि.औरंगाबाद यांना अटक केले. त्यांच्याकडून (एमएच २७ एएस १२०१) क्रमांकाची दुचाकी तसेच कुऱ्हाड, ड्रिल, कुदळ आणि कानस असे साहित्य हस्तगत केले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांकडून चोरलेल्या चंदन पैकी १२ हजार रुपये किमतीचा ५ किलो चंदनाचा तुकडा जप्त केला आहे. या गुन्ह्यात कन्नड तालुक्यातील आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रमेश चव्हाण, पो.उ.नि. लोकेश पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पो.ना. जयंत सपकाळे, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी कारवाई करत दोघांना अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. जयंत सपकाळे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!