जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातून दुचाकीवरुन खोक्यातून देशी दारुची वाहतूक करणार्या तरुणावर सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत २४९६ रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत वृत्त असे की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार असलेले पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना मेहरुण परिसरातून दुचाकीवरुन दोन जण देशी दारुची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक मुदस्सर काझी, इम्रान सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील या पथकाला सुचना केल्या. या पथकाने मेहरुण परिसरातील पाणी पुरवठा कार्यालयाजवळ सापळा रचला. याठिकाणी माहितीनुसार एम.एच.१९ डी.जे.४३५२ या क्रमाकांच्या दुचाकीवरुन एकजण जातांना दिसला. त्यांची चौकशी केली असता, विनोद अशोक महाजन (वय ३९ रा. रामेश्वर कॉलनी) असे दुचाकीस्वाराचे नाव असल्याचे समोर आले. त्याच्याकडील खोक्यात देशी दारुच्या ४८ देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या. देशी दारुसह दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून विनोद महाजन याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.