दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार

लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरु

जम्मू : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पंपोर बायपासवर दहशवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रोड ओपनिंग पार्टीच्या जवानांवर खुलेआम गोळीबार करण्यात आला. पाच जवान जखमी झाले आहेत. तंगनजवळ जम्मू – श्रीनगर हायवेवर हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर सेनेनं या भागाला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू केलंय.

हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आवर घालण्यासाठी ताबडतोब इतर सुरक्षा दलांना सूचित करण्यात आलं. सीआरपीएफच्या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर घात लावून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय.

कंडीजाल पुलानजिक लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक नाका पार्टीवर गोळीबार सुरू केला. सावध असलेल्या जवानांनी हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाच जवान गंभीररित्या जखमी झालेत.

एका दिवसापूर्वीच जम्मू – काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात सेना आणि पोलिसांच्या संयुक्त टीमनं हत्यारांचा साठा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या हत्यारांत मोठ्या दारुगोळ्यासहीत एके ४७ रायफल्स, तीन मॅक्झीन आणि एका पिस्तुलाचाही समावेश होता. सुरक्षा दलाला दहशतवाद्यांच्या ठिकाणांबद्दल एक विशेष सूचना मिळाली होती. त्या आधारावर या भागात तपासणी मोहीम राबवण्यात आली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.