दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश !

गावठी पिस्तूलासह जिवंत काडतूसे हस्तगत; सहा पैकी दोन संशयित अल्पवयीन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अजिंठा चौकातील एसटी वर्कशॉप परिसरातून अटक केली आहे. यातील दोन संशयित अल्पवयीन आहेत. संशयितांकडून दोन दुचाकी, गावठी पिस्तूल, काडतूस आणि मोबाईल असा मुद्देमाल हास्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील एसटी वर्कशॉप परिसरातील अंधारात काही तरूण रस्ता लुट करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, प्रदीप पाटील, दिपक चौधरी, अशपाक शेख यांनी शुक्रवारी १९ मे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी स्वप्निल उर्फ गोल्या धर्मराज ठाकूर (वय-१९), निशांत प्रताप चौधरी (वय-१९) दोन्ही रा. शंकरराव नगर, डीएनसी कॉलेज, जळगाव, पंकज चतूर राठोड (वय-१९) रा. तुकारामवाडी, जळगाव, यश देवीदास शंकपाळ (वय-१९) रा. आसोदा रोड, जळगाव आणि दोन अल्पवयीन मुले असे एकुण ६ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, ३ जिवंत काडतूस, दोन मोटारसायकली, मोबाईल व दरोड्याचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यापुर्वी संशयित आरोपी स्वप्निल ठाकूर यांच्यावर ५, निशांत चौधरी यांच्यावर ३ आणि यश शंकपाळ यांच्या १ असे यापुर्वी पोलीसात गुन्हे दाखल आहेत. संशयितांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक योगेश बारी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content