मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत काल झालेल्या वज्रमुठ सभेतील उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला आज भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल नागपुरात पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. काल ठाकरे म्हणाले, डोळ्यादेखत सर्व घडत असताना आपण शांत राहणे नेभळटासारखे आहे. आमच्या काळात कोरोनासारखे जागतिक संकट आले. आता अवकाळी पाऊस, गारपिटीसारखी संकट सातत्याने येत आहेत. याला कारण राज्यातील सरकार उलट्या पायाचे आहे. हे अवकाळी सरकार घालवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
या टीकेला भाजपने ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे, उद्धव ठाकरे म्हणाले फडतूस म्हणजे बिनकामाचा. म्हणजे सरकारमध्ये अडीच वर्षे असताना बिनकामाचा आणि घरात बसणारा कोण होता हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळेच तुमच्या फडतूसपणाला कंटाळून तुम्हाला घरी बसवले आहे. यासोबत भाजपने अजून जोरदार टिकास्त्र सोडत महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा ही अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.