नागपूर (वृत्तसंस्था) राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातले भरमसाठ बिल आले आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेले वीज बिल निम्म्याने माफ करावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
नाना पटोले टीव्ही-९ सोबत बोलतांना म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता घरी आहे. अनेक जणांचे ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि तत्सम इलेक्ट्रिक उपकरणे चालू असतात. त्यातच उन्हाळ्यात पंखे आणि एसी यांचाही वापर दिवसभर होत असल्याने वीज बिल वाढले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचे बिल जास्त आले आहे. तर दुसरीकडे, विजेचा वापर झाला नसतानाही अव्वाच्या सव्वा वीज बिल आकारले जात असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जास्त वीज बिल आलेल्या ग्राहकांना महावितरणकडून बिलाचे हप्ते पाडून देण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.