जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मरण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील टॉवर चौकात घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली असून यातील संशयिताला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील मूळ रहिवासी असलेल्या विक्की सांडू यादव (वय-२५) हा काही दिवसांपासून जळगावात राहत होता. मालवाहू वाहनाने हमाली काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होता. रविवारी २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या जुन्या वादातून टॉवर चौकात दोघांमध्ये वाद झाले. वाद वाढल्याने विक्की यादव याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी धाव घेत विवेक किशोर मराठे याला ताब्यात घेतले. जखमीला अगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.