तरुण मुस्लीम नेत्याने भारताच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणं कठीण : गुलाम नबी आझाद

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या गुलाम नबी आझाद यांनी एका मुलाखतीमध्ये एखाद्या तरुण मुस्लीम नेत्याला भारताचा पंतप्रधान होण्याची इच्छा उरी बाळगणं खूपच कठीण असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

 

“नजीकच्या भविष्यकाळात शक्यता कमी आहे. कदाचित काही दशकांनंतर एखादा मुस्लिम भारताचा पंतप्रधान होऊ शकेल ,” असं मत आझाद यांनी मुस्लीम नेता पंतप्रधान होऊ शकेल का यासंदर्भात भाष्य करताना व्यक्त केलं. राज्यसभेतील आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये आझाद यांनी, “मला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. जगात जर कुठल्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा,” असं मत व्यक्त केलं होतं.

 

आझाद यांनी २०१८ साली अलीगढ मुस्लीम विद्यापिठामधील विद्यार्थ्यांना संबोधित करतानाही यासंदर्भातील उल्लेख केला होता. “मला निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलवणाऱ्या हिंदू उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. लोकं आता घाबरलेली आहेत,” असं वक्तव्य आझाद यांनी केलं होतं. २०१८ मधील या भाषणानंतर भारतीय मुस्लीम असा संदर्भ तुम्ही भाषणात का दिला असा प्रश्न आजाद यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना देशातील वातावरण इतकं बिघडलं आहे की इतिहासामध्ये या उलट चित्र पहायला मिळायचं. ९९ टक्के हिंदू उमेदवार मुस्लीम मतांसाठी मला प्रचाराला बोलवायचे. मात्र आता हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे, असा संदर्भ मी एएमयूमध्ये दिला होता असं सांगितलं.

 

आझाद यांनी आपल्या त्या भाषणामध्ये एएमयूच्या माजी विद्यार्थ्यांसाठी संदेश असल्याचे सांगितले. राजदूत बनून त्या जुन्या भारताला पुन्हा वर्तमानात आणणं हे त्यांचं ध्येय असलं पाहिजे असं आपल्याला सांगायचं होतं. हा तो भारत होता जिथे मी १९८२ साली महाराष्ट्रामध्ये ९५ टक्के हिंदू व्होटबँक असणाऱ्या ठिकाणी निवडणूक लढलो होतो आणि जिंकून आलो होतो. “माझ्याविरोधात जनता पक्षाचा हिंदू उमेदवार होता तरी मी विजय मिळवला,” असंही आझाद यांनी सांगितलं.

Protected Content