मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईतील कोर्टाने एका २० वर्षीय आरोपीला अल्पवयीन मुलीला डोळा मारणे आणि फ्लाईंग किस केल्याने एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लैंगिक गुन्हा बाल संरक्षण कायदा अंतर्गत कोर्टाने हा निकाल दिला आहे.
आरोपीला एका वर्षाची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीला शिक्षा सुनावताना डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करणे म्हणजेच लैंगिक छळ असल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं आहे.
२९ फेब्रुवारी २०२० रोजी १४ वर्षीय पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत घराबाहेर जात असताना आरोपीने तिला डोळा मारला आणि फ्लाईंग किस केलं. आरोपीच्या कृत्यामुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी यापूर्वी देखील पीडित तरुणीसोबत असाच वागत होता. मुलीने याबाबत अनेकदा तिच्या आईला सांगितलं होतं. पीडित तरुणीच्या घरच्यांनी तरुणाला समजही दिली होती. मात्र कृतीत काहीच फरक न पडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दिली.
आरोपीने कोर्टात पीडित मुलीच्या बहिणीसोबत ५०० रुपयांची पैज लागल्याचं कारण पुढे करत कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र पैज लावल्याचा कोणताच पुरावा मिळाला नाही. त्यामुळे कोर्टाने पीडित तरुणीच्या बाजूने निर्णय देत आरोपीला शिक्षा सुनावली. आहे. आरोपीला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी १० हजार रुपये पीडित मुलीला देण्यास सांगितले आहेत.